Tuesday, May 4, 2010

ऍनिमेशन क्षेत्रातही मराठी पाऊल पुढे

ऍनिमेशन क्षेत्रातही मराठी पाऊल पुढे

मुंबई - मराठी मालिका अन्‌ चित्रपटांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. मराठीतील प्रतिभावंत कलावंतांची दखल राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतही मराठी कलाकारांनी आपला झेंडा रोवला आहे. आता त्यापाठोपाठ ऍनिमेशन क्षेत्रातही मराठी पाऊल पुढे पडले आहे. "फ्रेमफ्लिक्‍स ऍनिमेशन अवॉर्ड'च्या पहिल्या दहा नामांकनामध्ये मराठी तरुणांच्या तब्बल चार ते पाच "ऍनिमेशन शॉर्टफिल्म' दाखल झाल्या आहेत. त्यांची नावे सोमवारी जाहीर करण्यात येतील. अंतिम सोहळा 16 मे रोजी गोवा येथे पार पडणार आहे.




"ऍनिमेशन' तसेच "व्हिज्युअल्स इफेक्‍ट'मध्ये आवड असणाऱ्या तरुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी "फ्रेमबॉक्‍स' या आघाडीच्या ऍनिमेशन आणि "व्हिज्युअल्स इफेक्‍ट स्टुडिओ'ने "फ्रेमफ्लिक्‍स ऍनिमेशन अवॉर्ड'ची घोषणा केली. या पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. केवळ भारतातूनच नाही तर भारताबाहेरीलही काही तरुणांनी आपापल्या "शॉर्ट फिल्म' पाठविल्या होत्या. त्यापैकी केवळ दहा "ऍनिमेशन शॉर्टफिल्म'ची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये चार मराठी तरुणांच्या "शॉर्टफिल्म' आहेत. त्यामध्ये पुणे येथील दोन आणि वाशी (नवी मुंबई) व अंधेरी (मुंबई) येथील एकेक "शॉर्टफिल्म' निवडण्यात आली आहे. त्यांची नावे नंतर जाहीर करण्यात येणार आहेत. याबाबत "फ्रेमबॉक्‍स'चे सीईओ नवीन गुप्ता म्हणाले, ""आम्ही "ऍनिमेशन'मध्ये "करिअर' करणाऱ्या नवनवीन गुणवान कलाकारांना नेहमीच संधी देत आलो आहोत. महाराष्ट्रातील तरुणांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला लाभला. "धूम' चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी, एएए डिजिटल इमॅजिनचे अरविंद कुमार, प्राणा स्टुडिओजचे नीलेश सरदेसाई अशा एकूण अठरा जणांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.''

Saturday, May 1, 2010

'बिझनेस

व्यवसायाच्या यशात व्यवस्थापनाचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे व्यवस्थापकीय अधिका-यांची जबाबदारी सगळ्यात मोठी.


व्यवस्थापकीय क्षेत्रातील गुरू मानले जाणा-या लोकांना धोरण, निर्णय याबद्दल बोलायला आवडतं हे खरं परंतु बरेचवेळा व्यवस्थापनाचे निर्णय हे प्रत्यक्षात अधिका-यांच्या व्यक्तिगत अनुभवांवर आधारलेले असतात. असे वेगळे उदाहरण म्हणून महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून राहणारे व्यवस्थापन गुरू जयशंकर ह्यांचे नाव घ्यावे लागेल. जय म्हणून ओळखले जाणारे जयशंकर बहूराष्ट्रीय कंपन्यांसाठी 'बिझनेस महाराजा' म्हणूनही ओळखले जातात. अवघ्या ४१व्या वर्षी 'पर्किन एल्मर' या बहुराष्ट्रीय कंपनीच्या अध्यक्षपदाची जय यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. अब्जावधी रूपयांचं उत्पन्न असलेली पर्किन एल्मर १२५ देशांमध्ये कार्यरत आहे.



जयशंकर यांनी ''बिट्स पिलानी'' मधून अभियंतेची पदवी मिळवून कोलकत्ता आयआयएम येथून एमबीएची व्यवस्थापकीय पदवी घेतली आहे. त्यांनी 'हिंदूस्थान लिव्हर'मधून आपल्या करिअरचा प्रवास सुरू केला. लिव्हरमधील अन्न-तंत्रज्ञान विभागात १३ वर्षांच्या अनुभवानंतर 'ग्लॅक्सो' कंपनीच्या माध्यमातून औषधी कंपन्यांच्या जगामध्ये प्रवेश केला. जय 'नोवार्टिस' या कंपनीमध्ये जागतिक कार्यवाही विभागाचे अध्यक्षही होते. सेल्स, मार्केटींग, संशोधन विभाग, सप्लायचेन अशा विविध विभागांमध्ये काम करून जय यांचे अनुभव विश्व अधिक समृध्द झाले. प्रचंड ऊर्जा, दूरदृष्टी असलेला सृजनशील नेता मिळाल्यामुळे पर्किन एल्मरसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ठरवलेल्या गोष्टी पूर्णत्वाला नेण्याचाच जय यांचा खाक्या असतो. आज ते त्यांच्या कंपनीला भारतातील 'आरोग्य विज्ञान' क्षेत्रात प्राथमिक स्थान मिळवून देण्यासाठी फक्त नेतृत्व करत नाहीत तर भारतातील तमाम जनतेची आरोग्यशैली उत्तम होण्यासाठी सुध्दा प्रयत्नशील आहेत.



जय यांच्या दूरदृष्टीने प्रत्येक दिवस नवीन संधीची दालनं उघडून देणारा आणि आव्हानपूर्ण असतो. 'बिझनेसच्या प्रत्येक पैलूमध्ये सृजनशीलता आणि नवीन कल्पनांचं स्वागत करणं' हेच जय यांच बिझनेस तत्वज्ञान आहे. त्यांच्यामते कोणत्याही कठीण आव्हानावर कठोरपणे वस्तूनिष्ठ पध्दतीने चिकित्सा करुन तसेच सकारात्मक दृष्टीकोनातून मात करता येते. कंपनीमधील कर्मचारी ही त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठी ताकद आहे. जय म्हणतात, ''कर्मचा-यांना तुम्ही सशक्त दृष्टीकोन असलेल्या, उत्तम ब्राण्ड आणि उच्च मूल्य जपणा-या कंपनीमध्ये काम करत आहात याची जाणिव करून देणं गरजेचं असतं आणि आम्ही ती करून देतो." जर ते या गोष्टींना बांधील राहिले, तर कामाला पोषक असं उत्साही वातावरण निर्माण होऊन कंपनीची उत्पादन क्षमता वाढते.



तुम्ही तुमच्या सहका-यांना प्रेरणा कशी देता असा प्रश्न विचारला असताना जयशंकर म्हणतात, ''जर तुम्ही नम्र असलात तर कोणालाही तुमच्याकडे यायला दडपण वाटणार नाही. अध्यक्षाच्या खूर्चीमध्ये न बसता ऑफिसमधील सहका-यांच्या बरोबरीने त्यांच्याकृतीमध्ये सामील होणं अतिशय महत्वाचं आहे. स्वप्न बघणं, त्यासाठी स्वत:ला सारखं प्रेरणा देणं महत्त्वाचं आहे. कंपनी प्रमुखाने स्वत:साठी आणि कंपनीसाठी पात्रतेची पातळी ठरवणं गरजेचं आहे. ती स्पष्ट असली की योग्य दिशा मिळते. सरते शेवटी आदर मागून मिळत नाही तर कमवावा लागतो."



जयशंकर हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, गुजराथी, बंगाली, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, या भाषा अस्खलित बोलतात. मराठी वाचता येतं पण शुध्द आणि अस्खलित बोलता येत नाही, बोललेलं समजतं! त्यामुळे सहका-यांशी संवाद साधणं शक्य होतं. जय हे उत्तम खेळाडूसुध्दा आहेत. शाळा-कॉलेजमध्ये असतांना टेबल टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट खेळलेले आहेत. फुटबॉल अजूनही खेळतात. मुंबईच्या पीडीपी मैदानावर त्यांनी 'सॉकर-क्लब' स्थापन केला आहे. १९९८ साली रगबी खेळतांना डाव्या पायाच्या हाडाजवळचा भाग तुटला होता. डॉ. श्रीनिवास यांनी त्यांना चालता येणं शक्य नसल्याचं सांगितलं. भौत्तिकोपचार तज्ज्ञाकडून सहा महिने त्यांनी व्यायाम करवून घेतला. त्यावेळी त्यांना उचलून गाडीमध्ये ठेवून ऑफिसला न्यावं लागतं होतं. मुंबई मॅरेथॉनला धावण्याच्या महत्त्वकांक्षेपायी त्यांनी चालायला आणि नंतर धावायला सुरुवात केली.

गेली चार वर्ष जयशंकर मुंबई मॅरेथॉन धावत आहेत. त्यांच्यामते मॅरेथॉन धावतांना आपल्याला ऑलिम्पिक धावपटू बरोबर स्पर्धा करायची नसून ती स्पर्धा स्वतःशीच असते. त्यासाठी नियोजन करणं आणि नियोजन कार्यवाहीत आणणं ह्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो.



जयशंकर यांना मदर तेरेसा प्रेरणादायी वाटतात. गरजूंना मदत करणे आणि लोकांशी संवाद साधून अनुभव आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यातून जय समाजाशी बांधिलकी ठेवण्याचा प्रयत्न करतात. जय यांची पत्नी अर्थशास्त्रज्ञ आहे. त्यांना सहा आणि अकरा वर्षाचे दोन मुलगे आहेत. कुटूंबापासून प्रचंड आनंद आणि उर्जा मिळते असं जय अगदी आवर्जून सांगतात.



नवीन तंत्रज्ञानाची जाण, खिलाडूवृत्ती, कुटूंब आणि ऑफिसमधील कर्मचा-यांशी मुक्तपणे संवाद साधणारे जयशंकर एका यशस्वी व्यवस्थापकाशिवाय अत्यंत उमदा माणूस म्हणून ओळखले जातात ह्यात नवल ते काय.