Tuesday, December 8, 2009

बाबरीप्रश्‍नी शिवसेना लोकसभेत आक्रमक

बाबरीप्रश्‍नी शिवसेना लोकसभेत आक्रमक

नवी दिल्ली - "1942 च्या स्वातंत्र्य चळवळीपेक्षाही रामजन्मभूमी आंदोलन अधिक उग्र होते आणि त्याचे नेतृत्व शिवसेनेने केले याचा अभिमान वाटतो', असे प्रतिपादन शिवसेनेचे गटनेते अनंत गिते यांनी मंगळवारी लोकसभेत व्यक्‍त केला. साऱ्या देशात बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नव्हते, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच पुढे येऊन शिवसैनिकांनी हे काम केले असेल, तर त्याची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली होती, याची आठवण करून देत या आंदोलनाचे श्रेय केवळ भाजपला जाऊ नये, याची खबरदारीही शिवसेनेने घेतली.




लिबरहान आयोगावरील चर्चा शेवटच्या टप्प्यात असताना ती तापण्यास गिते यांच्या भाषणापासूनच सुरवात झाली. "लिबरहान आयोगाच्या अहवालामध्ये बाबरी मशीद पाडली, तेव्हा बाळासाहेब ठाकरे अयोध्येत होते', असे म्हटल्यावर आक्षेप घेऊन लिबरहान यांनी तरी हा अहवाल वाचला आहे का, अशी पृच्छा केली.



शिवसेनेला चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याच्या दृष्टीने केलेल्या या भाषणाने सभागृहातील वातावरण बिघडू लागल्याने लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांनी गिते यांना संवेदनशील विषयावर बोलताना शब्द जपून वापरण्याची सक्‍त ताकीदच दिली. "बाबरी मशीद पाडणे हे काही चुकीचे पाऊल नव्हते. वादग्रस्त वास्तू पडल्याचा शोक देशाने 17 वर्षे करण्याची काय आवश्‍यकता आहे', असा सवाल करून गिते यांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले. त्यांच्या या वक्‍तव्यावर सभागृहात कमालीचा गोंधळ झाला. बहुसंख्याकांना अल्पसंख्याकांमुळे असुरक्षित वाटणे धोकादायक असल्याचे वक्‍तव्य करून ते म्हणाले, "भारतातील संसदेत आहात म्हणून अल्पसंख्याकांना अशा प्रकारे वागता येते. मात्र, पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना अशा प्रकारची मोकळीक नाही.' यावर जम्मू - काश्‍मीरमधील खासदारांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यावर काश्‍मीरमधून साडेतीन लाख हिंदूंना स्थलांतर का करावे लागले, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.



गिते हिंदीतून भाषण करायला लागल्यावर "हिंदीतून बोलाल तर महाराष्ट्रात राज ठाकरे तुम्हाला जाब विचारतील, मुंबईत मारलेले बिहारी हिंदू नव्हते का', अशा प्रकारची शेरेबाजी सत्ताधाऱ्यांनी केली. गिते जाणीवपूर्वक वातावरण तापविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे लक्षात आल्यावर गृहमंत्री पी. चिदंबरम हेदेखील अस्वस्थ झाले होते.
 
Ref :- eSakal

No comments:

Post a Comment