Tuesday, August 17, 2010

आमीर लाईव्ह...

"पीपली लाईव्ह' हा आमीर खानची निर्मिती असलेला चौथा चित्रपट. मनोरंजनाबरोबरच काहीतरी "सोशल मेसेज' देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आमीरच्या या चित्रपटातही त्या पद्धतीचा वेगळेपणा आहे. पत्रकारिता करणाऱ्या अनुषा रिझवीचा हा पहिलाच चित्रपट. त्यानिमित्तानं आमीरशी साधलेला हा संवाद.



"पीपली लाईव्ह'चा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी काही संबंध आहे का?

- अजिबात नाही. गेल्या वर्षभरापासून मी या चित्रपटाचा शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी कसलाही संबंध नसल्याचं सांगत आलोय; परंतु त्यावर आपल्याकडचा "मीडिया' थोडाही विश्‍वास ठेवायला तयार नव्हता; परंतु या चित्रपटाच्या "प्रोमोज'चे प्रक्षेपण सुरू झाल्यानंतर या चित्रपटाच्या कथानकाबाबतचे गैरसमज दूर झाले आहेत. हा चित्रपट म्हणजे आपल्या समाजावरचं प्रहसन आहे. ग्रामीण भारत आणि शहरी भारतामधील दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. या चित्रपटात त्यावर खुसखुशीत भाष्य करण्यात आलंय.



"जाने भी दो यारो' तसेच श्‍याम बेनेगलांच्या "वेलकम टू सज्जनपूर' आणि "वेल डन अब्बा'सारखा या चित्रपटाचा फॉर्म आहे का?

- श्‍यामबाबूंचे हे दोन्ही चित्रपट मी अजूनपर्यंत पाहिलेले नाहीत. त्यामुळे त्याबद्दल मला भाष्य करता येणार नाही. मात्र "जाने भी दो यारो'शी या चित्रपटाचा संबंध आहे, हे मी सांगू शकतो. "जाने भी..'मध्ये भ्रष्टाचारावर प्रहसन करण्यात आलं होतं; मात्र हा चित्रपट फार्सिकल अंगानं जाणारा होता. आमचा चित्रपट फार्सिकल नसून वास्तव विनोदावर तो आधारला आहे.



अनुषाचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपट माध्यमाशी ती निगडित नसतानाही तू तिला थेट हा चित्रपट दिग्दर्शनासाठी कसा काय दिलास? अशा लहान "बजेट'च्या चित्रपटाची निर्मिती कराविशी तुला का वाटली?

- माझ्या दृष्टीनं कथानक हा चित्रपटाचा प्राण असतो. कथानक जर मला आवडलं तर मग इतर गोष्टी माझ्यासाठी सोप्या होतात. त्या वेळी मला मग माझ्या चित्रपटाचा कॅनव्हास लहान आहे की मोठा? असा प्रश्‍न पडत नाही. कथानक आवडलं तर मी थेट त्यात काम तरी करतो किंवा त्याची निर्मिती तरी करतो. "लगान'ची मी निर्मिती केली तेव्हा त्याची "कमर्शियल व्हॅल्यू' मी तपासली नव्हती. नेमकी तीच गोष्ट माझी निर्मिती असलेल्या "तारे जमीं पर'लाही लागू आहे. "रंग दे बसंती' जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा भगतसिंहांवर तब्बल चार चित्रपटांची निर्मिती झाली होती. त्यामुळे या चित्रपटाचा "कमर्शियल अँगल' कुठेही उद्‌भवतच नव्हता. तरीदेखील या चित्रपटाचं कथानक आवडल्यानं मी तो केला आणि त्याचा पुढचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. मी माझ्या "इन्स्टिंक्‍ट'वर निर्णय घेतो. आता अनुषाच्या नवखेपणाबद्दलच म्हणत असशील, तर तो माझ्यासाठी फारसा मोठा "इश्‍यू' नव्हता. कारण यापूर्वीही मी अनेक नवोदितांबरोबर काम केलं असून त्यांच्यासोबतचा माझा अनुभव खूप चांगला आहे. अनुषानं ऐकवलेलं कथानक मला खूप आवडलं. यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्यासाठीही नवीन होत्या. "बीडीओ' हा काय प्रकार असतो हे मला माहीत नव्हतं. पटकथा वाचल्यानंतर मला "बीडीओ' म्हणजे "ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर' असतो हे समजलं. त्यानंतर तिनं मला काही "टेस्ट शॉट्‌स' दाखवले. तेसुद्धा चांगले उतरले होते. ते पाहिल्यानंतर माझा तिच्याबद्दलचा विश्‍वास वाढला. आता चित्रपट पाहिल्यानंतर मी दाखविलेला विश्‍वास तिनं खरा केला, याचा मला आनंद आहे.



"पीपली लाईव्ह'मध्ये अभिनेता रघुवीर यादवचा अपवाद वगळता इतर सर्व कलाकार नवीन आहेत. असं करणं तुला "रिस्की' वाटलं नाही का?

- कथानकाची जी गरज आहे, ती पुरी करणारे चेहरे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. या चित्रपटातील कलावंतांची निवड अनुषा आणि या चित्रपटाचा सहदिग्दर्शक मेहमूदनं केली आहे. या दोघांनीही शक्‍यतो खरे चेहरे निवडले आहेत. यातल्या बहुतेक सगळ्या चेहऱ्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. हबीब तन्वीर यांचा एक "थिएटर ग्रुप' आहे. त्यातील काही कलावंतांची निवड करण्यात आलीय. या सर्व चेहऱ्यांना रंगभूमीचा अनुभव असला तरी चित्रपट माध्यमासाठी त्यांनी पहिल्यांदाच काम केलंय. मी हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यातील सर्व कलावंतांचा अभिनय पाहून मी थक्क झालो. कारण, या क्षेत्रात येऊन मला वीसहून अधिक वर्षं झालीत. मात्र अजूनदेखील मला असा "परफॉर्मन्स' देता आलेला नाही.



चित्रपटसृष्टीतील कलावंतांची तू चांगलीच थट्टा करतोस. मात्र या चित्रपटात तुझीच थट्टा करण्यात आलीय. याबद्दल काय सांगशील?

- खरंय हे. या चित्रपटातला विनोद वेगळ्या पद्धतीचा आहे. अनुषानं अनेक गोष्टींची खिल्ली उडवलीय. तिला माझीही खिल्ली उडवायची होती. या चित्रपटात "मीडिया'ला खूप महत्त्वाचं स्थान आहे. हा "मीडिया' आमच्या चित्रपटाचं "रिपोर्टिंग' करतोय, ही कल्पना होती. या "रिपोर्टिंग'मधून चित्रपटातल्या प्रमुख पात्रांची ओळख आम्ही दाखवलीय आणि त्याचे तसे "प्रोमोज'ही विविध वाहिन्या तसेच चित्रपटगृहांमधून सुरू आहेत. या चित्रपटाचं भोपाळजवळ शूटिंग सुरू होतं तेव्हा खरोखरीच एक जत्रा भरली होती. बरीच गर्दी असल्यानं तिथं वेगवेगळ्या वस्तू विकणारे विक्रेतेही आले. त्यातच माझ्या "गजनी' चित्रपटाचा फोटो असलेले वेफर्सही विकायला आले होते. हे वेफर्स काही आमच्या "प्रॉडक्‍शन'कडून उपलब्ध झालेले नव्हते. या वेफर्सवर एका वाहिनीचा प्रतिनिधी भाष्य करतो. "ये पागल हो गया है । भय्या बार बार "लगान' नहीं बनती' असा एक संवाद आहे. अशा पद्धतीनं अनुषानं माझी खिल्ली उडवलीय. तिला हा प्रसंग चित्रपटात हवा होता. मात्र त्यासाठी योग्य जागा न मिळाल्यामुळे आम्ही तो फक्त "प्रोमोज'मध्येच ठेवलाय.



तुझी निर्मिती असलेल्या चित्रपटांना विदेशातूनही मोठी मागणी असते. त्यामुळे "पीपली लाईव्ह'च्या विदेशातील प्रदर्शनासाठी काही खास तयारी केली आहेस का?

- "पीपली लाईव्ह'चे विदेशी हक्क विकताना आम्ही खूप काळजी घेतली. तिथल्या वितरणाचा अभ्यास करताना मला आढळलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडचं वितरण तंत्र हे अधिक चांगलं आहे. म्हणूनच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह मध्य पूर्व देशांमध्ये हा चित्रपट आम्ही स्वतःच वितरित करतो आहे. अमेरिकेत सर्वसाधारणपणे चांगला हिंदी चित्रपट 10 लाख डॉलर्सचा व्यवसाय करतो. आमच्या "थ्री इडियट्‌स'नं 70 लाख डॉलर्सचा व्यवसाय केला होता.



नवीन चित्रपट कधी स्वीकारणार आहेस?

- सध्या तरी फक्त "पीपली लाईव्ह'. त्याच्यातून बाहेर पडलो की मग "धोबी घाट' आणि नंतर "देल्ली बेली'. या तीन चित्रपटांचं प्रदर्शन मार्गी लागलं की मग मी अभिनय करायला मोकळा होणार आहे.



1 जुलैला तू ट्‌विटरवर आला आहेस. चाहत्यांचा तुला कसा रिस्पॉन्स मिळत आहे.

- मी ट्‌विटरवर आलो नाही, मला जबरदस्तीनं आणलं गेलं. तंत्रज्ञानाच्या बाबतीत मी थोडा मागं आहे. मात्र बच्चनसाहेबांनी मला ट्‌विटरवर येण्याचा आग्रह केला आणि माझ्याकडून 1 जुलै ही तारीखही वदवून घेतली. अर्थात, चाहत्यांचा प्रतिसाद जबरदस्त आहे.

अमिताभ बच्चन हेच माझे गुरू - रजनिकांत

मुंबई - खरं तर दाक्षिणात्य चित्रपटरसिकांच्या मनातला तो देव, पण चित्रपट क्षेत्रात तो बिग बी अमिताभ बच्चन यांना आपला गुरू मानतो. नव्हे, तर अमिताभ त्याचे प्रेरणास्थान.




दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीवर राज्य करणारा रजनिकांत अमिताभ यांच्याविषयी भरभरून बोलतो, तेव्हा तो माणूस म्हणूनही किती मोठा आहे, याचा प्रत्यय येतो. रजनिकांतच्या बिगबजेट रोबो या चित्रपटाचे संगीत रविवारी रात्री लॉंच झाले. त्यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील या दोन्ही दिग्गजांना रंगमंचावर एकत्र पाहण्याची संधी रसिकांना मिळाली. रजनिकांतने तब्बल तीन वर्षांनंतर मुंबईत पाऊल ठेवले.



नव्वदच्या दशकांत झळकलेल्या हम या चित्रपटात अमिताभ आणि रजनिकांतची जोडी रसिकांनी एंजॉय केली होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी तो आपल्या शिवाजी द बॉस या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी मुंबईत आला होता.



रोबो संगीत लॉंचच्या निमित्ताने अमिताभ यांना भेटून आनंदीत झालेला रजनिकांत त्यांच्याविषयी भरभरून बोलला. तो म्हणाला, अमिताभ हे माझे प्रेरणास्थान आहेत. तसेच, ते माझे रोल मॉडेल आणि गुरूही आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाच्या वेळी त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा मी नेहमीच आदर करतो. अंधा कानून, गिरप्तार आणि हम या चित्रपटांमधून आम्ही दोघांनी एकत्रित काम केले. त्यावेळी त्यांनी मला जे प्रेम दिले. माझी जी काळजी घेतली, ती मी कधीही विसरणार नाही.



रजनिकांत यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमिताभ यांनी रजनिकांत इथल्या मातीचे सच्चे सुपूत्र असल्याची भावना व्यक्त केली. मी रजनिकांतबरोबर अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे एक मित्र म्हणून आणि एक सहकारी म्हणून मला त्याचे महत्त्व वाटते. तो या मातीचा सच्चा सुपूत्र आहे, ज्यावर सर्व भारतवासी प्रेम करतात.



त्याची नम्रता आणि माणुसकीबद्दल मला कौतुक वाटते. त्याला मिळालेले प्रसिद्धी, मोठेपणाचा त्याने जमिनीवर राहूनच आनंद लुटला. त्याच्यातील नम्रता प्रत्येक भारतीयाने उदाहरण म्हणून डोळ्यासमोर ठेवण्याजोगी आहे. त्याच्या साधेपणाचा, प्रामाणिकपणाचा माझ्यावर विशेष प्रभाव आहे, असेही अमिताभ म्हणाले.



हॉलिवूडच्या धर्तीवर रोबो हा चित्रपट अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेला चित्रपट आहे. जेव्हा एखादा रोबेट माणसाच्या शरीरात शिरकाव करतो, तेव्हा काय काय होते, याचे चित्रण या चित्रपटात केले आहे.