Thursday, March 11, 2010

आता ना राहिली... -मराठी कविता


आता ना राहिली...

 आता ना राहिली

स्वप्नांची जाग

जिद्दीची आग अन

अन्यायाचा राग

आता फक्त राहिले

सैतानी दाग

अश्रूंची साथ अन

कुंकवाची राख



आता ना राहिली

मायेची फुंकर

प्रेमाची झालर अन

गोजिरी पाखर

आता फक्त राहिले

छिन्नविछिन्न मुडदे

मासांचे उकिरडे अन

प्रेतांचे तुकडे



आता नाही दिसत

शांतीदूताचा संदेश

स्वच्छ सुंदर देश अन

माणुसकीचा लवलेश

आता फक्त दिसते

अंगाची चाळण

दहशतीचे वण अन

लाचार जन



आता ना राहीला

पूर्वीचा थाट

हिरवीगार वाट अन

नात्याची गाठ

आता फक्त राहीला

मृत्युचा गाडा

रक्ताचा सडा अन

झपाटलेला वाडा



आता नाही होत

मदतीचे हात

पाठीवर थाप अन

सुखाची झाप

आता फक्त होते

नेत्याची बडबड

छातीची धडधड अन

आशेची पडझड



आता ना राहिली

जगण्याची आस

प्रेमाची कास अन

सुखाचे तास

आता फक्त राहिला

असुराचा वास

भीतीचा भास अन

रावणाच्या घरी

रामच दास !




Tuesday, March 2, 2010

चार पेग घेता घेता... - मराठी कविता


चार पेग घेता घेता...



चार पेग घेता घेता काल रात्र झाली !

घरी पुन्हा पत्नी वाही शिव्यांची लाखोली ! ॥धृ॥

आम्ही गोड शब्दांची त्या आस का धरावी ?

जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी ?

कडू कारल्याच्या जिभेवरी जर पखाली ! ॥१॥



रोज घाव करिते पत्नीची जिह्वा कट्यारी;

रोज वंश सासरचा ती समूळऽ उद्धारी !

आम्ही गप्प ऐकत असतो आमुची खुषाली ! ॥२॥



अंत:पूर केले आहे बंद आम्हासाठी

ओसरीवरी ती धाडे निजावयासाठी !

आम्ही ते पती की ज्यांना बायको न वाली ! ॥३॥



उठा-बशा काढत काढत संपल्या उमेदी !

असा कसा झालो माझ्या घरी मीच कैदी ?

मी अपार दु:खी, माझी चालली हमाली ! ॥४॥



उभा फ्लॅट झाला आता एक बंदिशाला

जिथे सिंह ताटाखालिल मनी-माऊ झाला !

कसे पुरुष दुर्दैवी अन्‌ स्त्रिया भाग्यशाली ! ॥५॥



धुमसतात अजुनी उदरी भुकेचे निखारे !

अजुन अन्न मागत उठती रिक्त पोट सारे !

दूषणेच पत्नीची ती आम्हाला मिळाली ! ॥६॥



बरसतात ’खोड्या’वरती जिभेचे निखारे !

अजुन रक्त काढत बसती शब्द बोचणारे !

आम्ही महिषरूपी राक्षस; भासते ती काली ! ॥७॥



[उषःकाल होता होता ह्यावरून घेतलेली कविता]

मुन्ना बागुल