Monday, January 11, 2010

गीर अभयारण्यात साठ वन्य जीवांचा मृत्यू


गीर अभयारण्यात साठ वन्य जीवांचा मृत्यू

अहमदाबाद - वन्य जीवांच्या सुरक्षेसाठी असलेले गुजरातमधील गीर अभयारण्य आता मानवी हस्तक्षेपामुळे जीवघेणे ठरत आहे. गेल्या पाच वर्षांत या भागात वाढत्या रहदारीमुळे सुमारे साठ वन्य जीवांना आपले प्राण गमवावे लागले.




मानवाच्या घुसखोरीमुळे बळी गेलेल्या या वन्य जीवांमध्ये तीन पाली आणि नऊ हरणांचा समावेश आहे. दोनच दिवसांपूर्वी रात्री भरधाव जाणाऱ्या वाहनामुळे ससान गावाजवळील नदी पुलावर एका वृद्ध सिंहाचा मृत्यू झाला. पाणी पिण्यासाठी नदीकडे जात असलेल्या या सिंहाच्या अंगावर वाहन आले. जीव वाचविण्यासाठी त्याने पुलावरून खाली उडी मारली. या वेळी झालेल्या गंभीर दुखापतीमुळे या सिंहाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे गीर अभयारण्यात रात्रीची वाहतूक बंद करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली.
 
 
Ref :- eSakal

वाघांशी मैत्री करणारा पर्यावरणवादी

वाघांशी मैत्री करणारा पर्यावरणवादी

बिली अर्जनसिंग यांच्या निधनाने अस्तंगत होत चाललेल्या वाघांचा एक भक्कम आधार गेला आहे. या निसर्गप्रेमी कलंदर व्यक्तिमत्त्वाविषयी...

एखादे ध्येय निश्‍चित करून त्याप्रमाणे आयुष्य जगण्याची संधी फार कमी जणांना मिळते. व्याघ्रप्रेमी आणि प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ बिली अर्जनसिंग त्यातील एक. वृद्धापकाळाने त्यांचे नुकतेच वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आणि अस्तंगत होऊ पाहणाऱ्या वाघांचा एक भक्कम आधार जणू हरपला...



कपूरथळ्याच्या राजघराण्याशी संबंधितांच्या कुटुंबात जन्मलेले, तत्कालीन "ब्रिटिश इंडियन आर्मी'मध्ये सेवा बजावलेले, तरुणपणी वाघांची शिकार केलेले आणि उत्तरायुष्यात वाघांच्या, निसर्गाच्या संवर्धनासाठी जगणारे आणि वन्य जीवनावरच्या अनेक पुस्तकांचे लेखक म्हणून पर्यावरणप्रेमींना बिली अर्जनसिंग परिचित होते. उत्तर प्रदेशाच्या लखिमपूर-खेरी जिल्ह्यातील दुधवा अभयारण्याच्या निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते कोठेही राहू शकले असते; पण त्यांनी दुधवा अभयारण्याचीच निवड केली आणि निवासस्थानाला नाव दिले, तेही समर्पक : "टायगर हेवन.' अखेरचा श्‍वासही त्यांनी तेथेच त्यांच्या लाडक्‍या अरण्याच्या सहवासात घेतला आणि आपले अंत्यसंस्कारही "ज्युलिएट' व "प्रिन्स' या त्यांनी वाढविलेल्या बिबट्यांच्या दफनभूमीशेजारी करावेत अशी अंतिम इच्छाही व्यक्त केली आणि त्याची पूर्तता त्यांच्या कुटुंबीयांनी केली.



बिली अर्जनसिंग यांचा जन्म 15 ऑगस्ट 1917 चा. तत्कालीन "ब्रिटिश इंडियन आर्मी'मध्ये त्यांनी 1940 मध्ये प्रवेश केला तेव्हा ते सेकंड लेफ्टनंट होते आणि 1946 मध्ये त्यांनी लष्कर सोडले तेव्हा ते लेफ्टनंट होते. लष्करातून बाहेर पडल्यावर बिलींनी निसर्गाच्या संवर्धनाकडे लक्ष पुरविण्यास प्रारंभ केला. ब्रिटिश राजवटीत झालेल्या अनिर्बंध शिकारीमुळे भारतातील वाघांची संख्या घटू लागली होती व स्वातंत्र्योत्तर काळात निसर्गप्रेमींनी वाघांसाठी आवाज उठवायला प्रारंभ केला. भारतात आज निसर्गसंवर्धानाच्या चळवळी जोर धरत आहेत आणि त्याचे थोडे श्रेय बिलींना द्यायला हवे. वाघांवर त्यांनी कायम प्रेम केले आणि अनाथ बछड्यांनाही सांभाळले. बंदिवासात वाघांचे प्रजनन करून त्यांना पुन्हा जंगलात सोडण्याच्या त्यांच्या कल्पनेला काही काळ विरोधही झाला. याच काळात बिलींच्या कानावर दुधवा जंगलाची साद आली आणि 1959 पासून ते तेथे राहावयास गेले, ते कायमचेच. जंगलाजवळ "टायगर हेवन' उभे राहिले आणि बिलींनी तेथूनच जगाचा निरोप घेतला. दुधवा अभयारण्याच्या स्थापनेत त्यांचा वाटा मोलाचा आहे.



वाघ आणि बिबटे म्हणजे फक्त रक्ताला चटावलेले हिंस्त्र प्राणी, ही समजूत बिलींनी त्यांचे पालकत्व पत्करून खोटी ठरवली. प्राण्यांचा सांभाळ करतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी शब्दबद्धही केले आणि त्यांच्या अनुभवांवर काही लघुपटही निघाले. वन्य जीवांच्या रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांवर "टायगर हेवन', ब्रिटनमधून आणलेल्या वाघिणीचे संगोपन करून तिला निसर्गात सोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवरचे "तारा' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली. त्याशिवाय "टायगर टायगर', "ए टायगर्स स्टोरी', बिलींच्या लाडक्‍या "हॅरिएट' बिबट्यावरचे "प्रिन्स ऑफ कॅट्‌स' तसेच "एली अँड द बिग कॅट्‌स', "टायगर बुक' आणि "वॉचिंग इंडियन वाईल्डलाईफ' ही पुस्तकेही बिली अर्जन सिंग यांनी लिहिली. त्यांच्या या निसर्गसंवर्धनाच्या कार्याची नोंद घेत डफ हार्ट-डेव्हिस या लेखकाने "ऑनररी टायगर- द लाईफ ऑफ बिली अर्जन सिंग' हे पुस्तकही त्यांच्यावर लिहिले.



बिलींच्या कार्यावर केवळ पुस्तकच लिहिले गेले नाही, तर "लेपर्ड ऑफ द वाईल्ड', "टायगर टायगर' आणि "द फायर ऑफ थाईन आईज' हे व्हिडिओपटही निघाले. बिली अर्जनसिंग यांच्या कार्याची नोंद सरकारनेही घेतली. 1995 मध्ये त्यांना "पद्‌मश्री' आणि 2006 मध्ये "पद्‌मभूषण' हे सन्मान प्रदान करण्यात आले. तत्पूर्वी आणखी एक मोठा सन्मान त्यांना लाभला. तो होता "जे. पॉल गेट्टी वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ऍवॉर्ड.' हा सन्मान विश्‍व प्रकृती निधीतर्फे (डब्ल्यूडब्ल्यूएफ) प्रदान केला जातो.



वयोमानानुसार बिली थकत गेले, पण अखेरपर्यंत त्यांचे निसर्गप्रेम कायम होते आणि अखेरचा श्‍वासही त्यांनी घेतला तो त्यांच्या लाडक्‍या अरण्यात, प्राण्यांच्या सहवासात...

Ref : - eSakal

Saturday, January 2, 2010

निरोप - कविता


निरोप - कविता

काळाच्या या नाजुक गाठी


दातांनीही सुटतिल ना

हळूच उमलती पंख हे कोमल

दो हातांनि मिटतिल ना ॥



काळ बसला मारित गाठी

मिटुनि डोळे लावुनि मन

वैशाख वणवा अलगद पेटे

कातरस्मृतींचे जळते वन ॥



कालाचे हे चाक दातेरी

ना कधीही मागे फिरे

कोण चिरडते पदी तयाच्या

कोण उरे आणि कोण मरे ॥



प्रसन्नतेचा झरा खळाळे

ओसंडुनि हे गात्र न् गात्र

निरोप देतो तुजला आता

भरूनि गेले घटिका पात्र ॥


- मुन्ना बागुल