Thursday, March 11, 2010

आता ना राहिली... -मराठी कविता


आता ना राहिली...

 आता ना राहिली

स्वप्नांची जाग

जिद्दीची आग अन

अन्यायाचा राग

आता फक्त राहिले

सैतानी दाग

अश्रूंची साथ अन

कुंकवाची राख



आता ना राहिली

मायेची फुंकर

प्रेमाची झालर अन

गोजिरी पाखर

आता फक्त राहिले

छिन्नविछिन्न मुडदे

मासांचे उकिरडे अन

प्रेतांचे तुकडे



आता नाही दिसत

शांतीदूताचा संदेश

स्वच्छ सुंदर देश अन

माणुसकीचा लवलेश

आता फक्त दिसते

अंगाची चाळण

दहशतीचे वण अन

लाचार जन



आता ना राहीला

पूर्वीचा थाट

हिरवीगार वाट अन

नात्याची गाठ

आता फक्त राहीला

मृत्युचा गाडा

रक्ताचा सडा अन

झपाटलेला वाडा



आता नाही होत

मदतीचे हात

पाठीवर थाप अन

सुखाची झाप

आता फक्त होते

नेत्याची बडबड

छातीची धडधड अन

आशेची पडझड



आता ना राहिली

जगण्याची आस

प्रेमाची कास अन

सुखाचे तास

आता फक्त राहिला

असुराचा वास

भीतीचा भास अन

रावणाच्या घरी

रामच दास !




No comments:

Post a Comment