Tuesday, August 17, 2010

मानवी व्यक्तिमत्त्वाचे व्यावहारिक पैलू

आपल्याला अनुकूल असणारा परिणाम साधण्यासाठी समोरच्या माणसाचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे गरजेचे असते. व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड पगडा माणसाच्या वागणुकीवर होतो. निरनिराळ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या माणसांचा प्रभाव त्यांच्या संपर्कात येणाऱ्या माणसांवर, कळत-नकळत होत असतो. व्यक्तिमत्त्वावर भावनांचा विशिष्ट प्रभाव आढळून येतो. वस्तुतः व्यवहारामध्ये भावनांना किंमत नसते. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनांना बाजूला ठेवणेच इष्ट असते.




"व्यक्तिमत्त्व म्हणजे नक्की काय,' या प्रश्‍नाचे अचूक उत्तर देणे कदाचित अवघड वाटेल, कारण व्यक्तिमत्त्व साकारणारे अनेक गुणधर्म हे व्यक्तीगणिक बदलत जातात. अनेक तत्त्ववेत्त्यांनी "व्यक्तिमत्त्व' या शब्दाच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. गॉर्डन ऑलपोर्ट यांनीच "व्यक्तिमत्त्व' या शब्दाच्या पन्नास व्याख्या केलेल्या आहेत. तथापि, या सर्व पुस्तकी व्याख्यांच्या अभ्यासातून फारसा व्यावहारिक अर्थबोध संभवत नाही.



व्यावहारिक पातळीवर "व्यक्तिमत्त्व' या शब्दाचे सोप्या भाषेत वर्णन करायचे झाले, तर ते खालीलप्रकारे करता येईल. "एखादा मनुष्य वरप्रकरणी जसा वाटतो, त्याला त्याचे व्यक्तिमत्त्व समजावे.' याचाच अर्थ एखादा मनुष्य वरकरणी जसा वाटतो, तसाच तो अंतरंगात असेलच असे नाही. बहुतांशी वेळा तो तसा नसतोच. परंतु, अशा बाह्यांगावर भाळणारे आणि विसंबून राहून निर्णय घेणारे बरेच लोक समाजात आढळून येतात.



वागणुकीवर परिणाम

व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड पगडा माणसाच्या वागणुकीवर होतो. निरनिराळ्या संस्थांमध्ये, औद्योगीक, सरकारी, निम-सरकारी, खासगी वगैरे. काम करणाऱ्या माणसांचा प्रभाव त्यांच्या संपर्कात येणाऱ्या माणसांवर, कळत-नकळत होत असतो. अशा ठिकाणी "चांगले व्यक्तिमत्त्व' किंवा "वाईट व्यक्तिमत्त्व' तसेच "अनुकूल व्यक्तिमत्त्व' किंवा "प्रतिकूल व्यक्तिमत्त्व' वर्गीकरण करणे, तितकेसे सयुक्तिक वाटत नाही.

काही व्यक्तींमुळे प्रशासनातील अवघड समस्या सहजपणे सोडवता येतात. तसेच काही व्यक्तींच्या अस्तित्वामुळे सर्व माणसांना अनावश्‍यक मानसिक त्रास होतो, काही व्यक्तींमुळे संस्थांमध्ये कलह होतात, असे अनेकदा ऐकण्यात येते. अशा सर्व समस्यांचे मूळ हे विशिष्ट व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वातच आढळून येते. समस्या निर्माण करणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व हे बऱ्याचदा अनाकलनीय किंवा गूढ असते. अशा व्यक्तिमत्त्वांच्या माणसांमुळे चांगले संबंध बिघडतात.



आपल्याला अनुकूल असणारा परिणाम साधण्यासाठी समोरच्या माणसाचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे गरजेचे असते. एखाद्या खटल्यामध्ये कशाप्रकारे बाजू मांडली असता, न्यायाधीश आपल्या बाजूने निकाल देतील, याचा अंदाज वकिलांना असणे गरजेचे असते. कुशल वकील ही बाब लक्षात घेऊन मुत्सद्दीगिरीने आणि धोरणाने वागून खटल्याचा निकाल स्वतःच्या बाजूने फिरवून घेऊ शकतो. या संबंधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये आलेला अनुभव विचारात घेणे, गरजेचे वाटते. एका खटल्याकडे अनेक कामगार युनियनचे तसेच उद्योजकांचे लक्ष्य होते. कारण, त्या खटल्यामध्ये कामगारांच्या प्रश्‍नांबाबत अनेक कामगारांचे भवितव्य ठरणार होते. न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत खटल्याची सुनावणी तब्बल नऊ वेळा पुढे ढकलली.



प्रत्येक वेळी ते वेगळ्या पक्षाची बाजू घेत. त्यामुळे सर्व लोक संभ्रमित झाले होते. एखादेवेळी असे वाटायचे, की खटल्याचा निकाल कामगारांच्या बाजूने लागेल, तर दुसऱ्यावेळी असे वाटायचे की खटल्याचा निकाल उद्योजकांच्या बाजूने लागेल. शेवटी दहाव्या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी निकाल हा कामगारांच्या बाजूने दिला.निकालानंतर न्यायाधीशांची व वकिलांची मुलाखत घेण्यात आली. न्यायाधीशांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारला, "आपल्याला हा निकाल देण्यासाठी सुनावणी नऊ वेळा पुढे का ढकलावी लागली?,' न्यायाधीश उत्तरले, "वस्तुस्थिती काय आहे हे पहिल्याच सुनावणीमध्ये माझ्या लक्षात आले होते. मी फक्त सर्व बाजू चाचपून पाहात होतो.'

पत्रकारांनी वकिलांना प्रश्‍न विचारला, "न्यायाधीश ज्या वेळी सुनावणी पुढे ढकलत होते, तेव्हा आपल्या धोरणांमध्ये काही बदल करावा असे तुम्हाला वाटले का?' वकील उत्तरले, "मी न्यायाधीशांचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे ओळखून आहे. मला माहीत होते की व्यक्तिमत्त्वाचा जो पैलू तो वरवर दाखवत होते, तो खरा नव्हता. त्यामुळे मी माझ्या धोरणावर व पवित्र्यावर ठाम राहिलो.'



संस्थांमध्ये काम करीत असताना सर्व कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरेच पैलू समोर येतात, असे नाही. "माणसे जे बोलतात, त्याच्या बरोबर उलटे वागतात,' असे ऋषी प्रभाकर यांनी म्हटलेले आहे. त्यामुळे कर्मचारी नक्की काय बोलतात यापेक्षा ते कोणती कृती करतात, हे महत्त्वाचे असते. अशा वागण्याला "संस्थांतर्गत राजकारण' असे म्हणतात.



(या ठिकाणी "राजकारण' या शब्दाचा अर्थ फक्त संस्थांमधील राजकारणांकरिता मर्यादित स्वरूपात वापरण्यात आला आहे.) अशा राजकारणी वर्तणुकीला किंवा राजकारणी डावपेचांना बळी न पडता योग्य ते निर्णय घेणे आणि सयुक्तिक वर्तणूक ठेवणे महत्त्वाचे असते.



निरनिराळ्या व्यक्तिमत्त्वाची माणसे ताण-तणावाच्या प्रसंगांना सामोरे जाताना वेगवेगळ्या भावनांचे प्रदर्शन करताना दिसतात. उदा. कार्यालयामध्ये कामाचा कितीही ताण असला तरीही काही माणसे पूर्णतः तणावमुक्त असतात. तसेच, काही लोकांना कोणतेही काम तणाव निर्माण करणारे वाटते. याउलट काही माणसे केवळ तणावाखाली किंवा काही माणसे केवळ तणावविरहित वातावरणातच काम करू शकतात.



एका हॉस्पिटलमध्ये माझ्या पाहण्यात एक प्रसंग आला. एका वृद्ध गृहस्थांचे "ऑपरेशन' सुरू होते. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर त्यांचे नातेवाईक जमा झाले होते. त्यांच्यामध्ये त्यांची दोन मुले होती.

दोनही मुले (एकाच परिस्थितीमध्ये) वेगवेगळ्या मनःस्थितीत वाटत होती. त्यांचा थोरला मुलगा अशांत आणि अस्वस्थ होता. त्याला वडिलांच्या तब्येतीची काळजी वाटत होती. त्याच्या देहबोलीतून ते स्पष्ट दिसून येत होते. त्याच वेळी त्यांचा दुसरा मुलगा अत्यंत शांत व संयमी दिसत होता. इतर नातेवाइकांशी मृदू आवाजात संभाषण करीत होता. यामधील एक व्यक्तिमत्त्व "आदर्श', असे ठरविणे चुकीचे आहे. हा दोन व्यक्तिमत्त्वांमधील महत्त्वाचा फरक आहे.



व्यक्तिमत्त्व आणि बुद्‌ध्यांक यांचा संबंध असतोच असे नाही. एका सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले होते, की माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याएवढाच बुद्‌ध्यांक असणारी भारतामध्ये पाच हजार माणसे होती. परंतु, अशा पाच हजार माणसांपैकी केवळ एकच माणूस पंतप्रधान होऊ शकला. याचाच अर्थ, बुद्‌ध्यांक हा व्यक्तिमत्त्वाचा किंवा यशस्वी होण्यातील केवळ एक भाग आहे. विशिष्ट परिस्थितीमध्ये बुद्धिचातुर्याने व्यक्तिमत्त्वाला अनुकूल मुरड घालून यश मिळवणे आवश्‍यक असते.



भावनांचा प्रभाव

व्यक्तिमत्त्वावर भावनांचा विशिष्ट प्रभाव आढळून येतो. वस्तुतः व्यवहारामध्ये भावनांना किंमत नसते. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनांना बाजूला ठेवणेच इष्ट असते. "क्रिकेटची टीम निवडत असताना पाषाणहृदयी असावे आणि गुणवत्ता या एकाच निकषावर आधारित खेळाडूंची निवड करावी,' असे भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी सुचवलेले आहे. तथापि, मानसिक भावनांचा अनादर करून किंवा त्यांना पूर्णपणे डावलून केवळ व्यावहारिक पातळीवर निर्णय घेणे कायम शक्‍य नसते किंवा बऱ्याचदा आवश्‍यक नसते. तारतम्याने विचार करून या बाबतीत निर्णय घेणे हितावह ठरते.



बुद्धी-मनाचा संबंध

मन आणि बुद्धी हे परस्परांबरोबर काम करत असतात. या दोघांच्या संवेदनांमध्ये जेव्हा भिन्नता येते किंवा खंड पडतो, तेव्हा माणसाला धक्का बसतो. उदा. रस्त्यावरून फिरत असताना अचानक मोठा आवाज होतो आणि एक अपघात होतो. कुतूहलापोटी गर्दीला मागे सारत आपण आवाजाच्या दिशेने जातो. जवळ पोचल्यावर असे दिसते, की आपण ज्या मित्राशी एका तासापूर्वी दूरध्वनीवर बोललो, तो अपघातात ठार झालेला आहे. अशा प्रसंगी बुद्धीला अपघातात आपला मित्र गेलेला आहे हे पटलेले असते, परंतु मन वस्तुस्थिती मान्य करायला तयार नसते.



व्यक्तिमत्त्व - जडणघडण हा संपूर्णतः वेगळा विषय आहे. व्यावहारिक पातळीवर विचार करता व्यक्तिमत्त्वाचे कोणते पैलू व्यावहारिक यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून विकसित करणे गरजेचे आहे, याचा सखोल विचार केल्यास अनेक समस्या सहजासहजी सुटू शकतात.

Ref : eSakal

No comments:

Post a Comment