Tuesday, August 17, 2010

वॅका, वॅका नव्हे, आता "यारो, इंडिया बुला लिया'

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीवरून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या गदारोळात सोमवारी एक उल्हसित करणारी बातमी समोर आली. या बातमीने सहाजिकच सर्वांच्या चेहेऱ्यावर हास्याची लकेर उमटून गेली. ऑक्‍टोबर महिन्यात होणाऱ्या या खेळाच्या महामेळ्याचे गीत ऑस्करविजेते भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या संगीतातून गुंजणार असून, फुटबॉल विश्‍वकरंडक स्पर्धेच्या निमित्ताने निर्माण झालेली "वॅका वॅका'ची "क्रेझ' या गीताने पुसली जाईल, असा विश्‍वास खुद्द संगीतकार रेहमान यांनी व्यक्त केला.




रेहमान यांच्याच हस्ते स्पर्धेच्या गीताचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी रेहमान म्हणाले, ""आता वॅका, वॅका नाही. आपल्याला त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन आकर्षक गीत सादर करायचे आहे. कसे, ते समजावून सांगण्यास कठीण आहे. पण जेव्हा ते तुम्ही ऐकाल तेव्हा हे गीत "वॅका, वॅका'पेक्षा वेगळे असल्याची तुमची खात्री पटेल.''



रेहमान यांनी या गाण्याविषयी काही माहिती दिली, पण गाणे कोणते असेल याबाबत त्यांनी गुप्तता बाळगली. केवळ गाण्याच्या सुरवातीचे शब्द त्यांनी ऐकविले. ते म्हणाले, ""भारतीय सांस्कृतिक वारसा आणि महात्मा गांधी यांना अभिवादन करणारा "ऑर्केस्ट्रा' करण्याचे नियोजन आहे. गाण्यासाठी भारतीय आणि परदेशी वाद्यांचे "फ्यूजन' उपयोगात करण्यात येईल. गाणे हिंदीतूनच असेल, पण यात दहा टक्के इंग्रजी शब्द असतील आणि गाणे असेल "यारो, इंडिया बुला लिया.'''



या गाण्याचे आज प्रकाशन करण्यात आले असले, तरी ते प्रदर्शित होण्यास अजून दहा दिवस तरी जाणार आहेत. रेहमान म्हणाले, ""गेले सहा महिने या गाण्यावर काम करत आहे. गाणे माझ्याच आवाजात असून, बरोबरीने कोरस असेल. माझी खात्री आहे की आम्ही केलेला प्रयोग यापूर्वी भारतात कधीच झाला नसेल. गाण्याच्या तयारीवर अखेरचा हात फिरवण्याचे काम चालू असून, अजून दहा दिवसांत ते पूर्ण तयार होईल. उद्‌घाटन सोहळ्यात या गाण्याची निश्‍चित "धूम' असेल आणि सर्व उपस्थित प्रेक्षकांना माझ्यासोबत मी गाण्याचे आवाहन करेन. खरेच हा अनुभव खूप जबरदस्त असेल.''



यालाही मंत्रिगटाचीच मान्यता

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे संयोजन समितीला निर्णय घेण्याचे कुठलेच अधिकार नाहीत. इथून पुढे मंत्रिगटाने "ग्रीन सिग्नल' दिल्यानंतरच त्यांनी घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. स्पर्धा गीताच्या निमित्ताने मंत्रिगटाने पहिला निर्णय दिला. रेहमान म्हणाले, ""माझी सर्व कामे बाजूला ठेवून मी या गाण्यात झोकून दिले आहे. मंत्रिगटाला हे गीत आवडेल की नाही याबाबत मन साशंक होते. पण त्यांना गाणे आवडले आणि त्यांनी लगेच गाण्याला मान्यता दिली.'' त्यांच्या मान्यतेनंतरच रेहमान यांच्या उद्‌घाटन सोहळ्यातील कार्यक्रमास मंजुरी मिळाली.



एकूणच स्पर्धेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांची झळ त्यांच्यापर्यंत येऊन पोचल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहनही केले. ते म्हणाले, ""प्रसारमाध्यमांनी आता नकारात्मक प्रसिद्धीपेक्षा सकारात्मक गोष्टी समोर आणण्यासाठी पुढे आले पाहिजे. लंडनमध्ये असतानाच मला नकारात्मक प्रसिद्धीची माहिती मिळाली होती. झाले गेले विसरून जा. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चला आपण एकत्र काम करुयात.''

No comments:

Post a Comment