Friday, February 19, 2010

तुमचा पासवर्ड तुमच्या पाकिटात ?


दिवसभरात आपण संगणकावर किती काम करतो ? किती संकेतस्थळे रोजच्यारोज उघडतो ? त्यातल्या किती संकेतस्थळांवर रोज लॉग इन करतो ? त्यातल्या प्रत्येक संकेतस्थळाचे युजर नेम आणि पासवर्ड लक्षात कसे ठेवतो ? गुगल, याहू, एमेसेन सारखी संकेतस्थळे त्यांच्या स्वत:च्या विविध सेवा वापरण्याकरता एकाच पासवर्डवर काम भागवतात. पण इतर संकेतस्थळांचे काय ? आपण अनेक बॅंकांचे खातेदार असतो…आजकाल नेट बॅंकिंगचा वापर करून लीलया इकडचे पैसे तिकडे वळवतो. अनेकदा ऑनलाईन गुंतवणूक करतो. ह्या सगळ्या गोष्टीत पैसा गुंतलेला असल्याने आपला पासवर्ड सुरक्षित कसा ठेवणार आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तो लक्षात कसा ठेवणार…..तर बहुतेकजण एकच पासवर्ड सगळीकडे वापरतात. युजरनेम आपण एकच वापरून चालू शकेलही पण पासवर्डही सगळीकडे एकच ठेवला आणि दुर्दैवाने तो चोरीला गेला तर काय ?यावर उपाय म्हणून मध्यंतरी महाजालावर एक युक्ती माझ्या वाचनात आली होती. खाली एक चित्र जोडले आहे. १४ x 6 आकाराचा एक आयत आहे. त्यात पहिल्या आडव्या ओळीत इंग्रजी A ते Z अशी एका रकान्यात प्रत्येकी दोन अक्षरे आहेत. पहिल्या उभ्या स्तंभात १ ते ५ असे अंक आहेत. दुसर्‍या ओळीपासून आणि स्तंभापासून त्यात काही संदर्भहीन अक्षरे आणि/किंवा अंक आहेत. आता याचा वापर करून आपण आपल्याला हव्या त्या संकेतस्थळाचा पासवर्ड कसा तयार करू शकतो बरं ?




उदा. मला माझ्या गुगल खात्याचा पासवर्ड तयार करायचा आहे. तर गुगल म्हणजे google….




g x 1 ओळ = 2w

o x 2 ओळ = 49

o x 3 ओळ = 87x

g x 4 ओळ = px56

l x 5 ओळ = uh



म्हणजे 2w4987xpx56uh इतका पासवर्ड पुरेसा आहे नाही का यात मध्ये मध्ये तुम्ही तुमच्या इच्छेने इतर अक्षरे किंवा अंक घालू शकता ( उदा. Pune……P2w4U987xpxN56uhE पण जर का ती विसरलात तर मात्र पंचाईत होईल कारण ती या यादीत नसतील. आजकाल सगळ्याच न्याहाळकात पासवर्ड सेव्ह करायची सोय असते. एकदा हा पासवर्ड तयार करून, न्याहाळकाला लक्षात ठेवायची आज्ञा दिली की काही प्रश्नच नाही. तुमच्या संगणकाशिवाय इतर कोणत्या संगणकावर असलात तरी हा कागद खिशात बाळगून तुम्ही केव्हाही तुमची खाती तपासू शकता. नुसता हा कागद जरी कोणाच्या हाती लागला तरी काही बिघडत नाही. तुमची खाती कोणती आणि त्याचे लॉग इन काय आहे हे इतरांना माहित असायचे कारण नाही.



तुम्ही ही खालचीच आकृती प्रमाण मानायला हवी असेही काही नाही. तुम्ही साध्या एक्सेल शीट मध्ये तुम्हाला हवी ती अक्षरे किंवा अंक घालून ह्या आकृतीचे प्रिंट काढून जवळ बाळगू शकता. संगणकावर सेव्ह करून ठेऊ शकता. कागद हरवला……खराब झाला….तरी तुमच्याजवळ तुम्ही केलेल्या फाईलची एक प्रत असेलच. या सुविधेचा वापर करा आणि कशी वाटली ते कळवायला विसरू नका मात्र.

No comments:

Post a Comment