Saturday, May 8, 2010

कापूस उत्पादकांसाठी नव्या खताचे वरदान


कापूस उत्पादकांसाठी नव्या खताचे वरदान

हिस्सार - कापूस उत्पादक शेतक-यांना आता मे आणि जूनमधील भाजून काढणा-या उन्हातही आपल्या पिकांचे रक्षण करता येणार आहे. येथील शास्त्रज्ञांनी अथक संशोधन करून, नवीन प्रकारच्या व्हर्मी कंपोस्ट खताची निर्मिती केली आहे. या खताच्या वापरामुळे कापसाचे ४५ ते ४८ अंश सेल्सिअस उष्णतेमध्येही योग्य संरक्षण होते, असा दावा करण्यात आला आहे.



या नव्या व्हर्मी कंपोस्ट खताला 'एझोटिका एचटी-५४' असे नाव देण्यात आले आहे. येथील चौधरी चरणसिंह कृषी विद्यापीठातील मायक्रो बायोलॉजी विभागातील शास्त्रज्ञांनी त्याचे तंत्र शोधून काढले आहे. मे आणि जून महिन्यांतील उन्हामुळे कापसाचे पीक कोमेजते आणि त्याच्या वाढीवर परिणाम होतो. ४५ ते ४८ अंश सेल्सिअस उष्णतेमध्ये हे पीक करपून जात असल्याचा अनुभव आहे. मात्र अशा उन्हातही ते टिकून राहावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून संशोधन चालू होते.


कडक उन्हामुळे अॅझोटोबॅक्टर, रिझोबियम, अॅजोस्पिरिलम, ग्लुकॉन ही वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सूक्ष्मद्रव्ये नष्ट होतात. मात्र 'एझोटिका एचटी-५४'मुळे ४८ अंशापर्यंतच्या उन्हातही या द्रव्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पोचत नाही, असे दिसून आले. हे खत विविध प्रकारांनी वापरता येऊ शकते. परंतु, बियाणांवर त्याची प्रक्रिया केल्यास, त्याचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो, असे येथील शास्त्रज्ञांनी सांगितले.

REF.- Esakal




No comments:

Post a Comment