Wednesday, May 26, 2010

शोएबची बंदी रद्द करण्यासाठी दबाव

इस्लामाबाद - बंदी आणि दंडाच्या शिक्षेतून शोएब मलिकची सुटका करण्यासाठी करण्यात येणारा डाव मी सफल होऊ दिला नाही, आणि तसे झाले असते तर शिक्षा झालेल्या इतर खेळाडूंवर अन्याय झाला असता, असा गौप्यस्फोट पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एजाझ बट्ट यांनी मंगळवारी केला.




शोएब मलिकची "सुटका' करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आपल्यावर दबाव टाकला जात आहे, अशी सनसनाटी माहिती एजाझ बट्ट यांनी उघड केल्यामुळे पाकिस्तान राष्ट्रीय असेम्बली समितीही (क्रीडा) आश्‍चर्यचकित झाली आहे. ऑस्ट्रेलिया वादग्रस्त दौऱ्यानंतर इतर खेळाडूंसह शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेल्या शोएब मलिकवर एका वर्षाची बंदी आणि दंड करण्यात आलेला आहे.



"माझ्यासाठी सर्व खेळाडू समान आहेत. मी कोणालाही झुकते माप देऊ शकत नाही आणि कोणावर अन्यायही करू शकत नाही,'' असे सांगून बट्ट म्हणाले, ""खेळाडूंवरील बंदी आणि शिक्षेसंदर्भातले प्रकरण लवादाकडे असून, त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई केली जाईल.''



एजाझ बट्ट यांच्यावर कोणी दबाव आणला याची माहिती उघड करण्यास पाकिस्तान क्रिकेट मंडळाने नकार दिला, परंतु शोएबच्या लग्नासाठी उपस्थित राहिलेल्या सियालकोटच्या खासदारांचे हे "प्रयत्न' असल्याचे समजते.



राष्ट्रीय असेंम्बली समितीचे नवे अध्यक्ष इक्‍बाल महम्मद खान यांना पाकिस्तान क्रिकेटच्या भल्यासाठी खेळाडूंना करण्यात आलेल्या दंड आणि बंदीच्या शिक्षेचा फेरविचार करण्याची सूचना केली आहे. माजी कर्णधार युनूस खानला करण्यात आलेली आजीवन बंदी उठविण्यासाठी ही समिती आग्रही असल्याचे बोलले जात आहे.



वासीम बारी अध्यक्ष असलेल्या चौकशी समितीसमोर झालेल्या चौकशीचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. हे चित्रीकरण काढून टाकण्याचीही मागणी राष्ट्रीय असेम्बली समितीने केली आहे.



पाक मंडळ फेरविचार करणार

दरम्यान, सात खेळाडूंवर करण्यात आलेल्या दंड आणि बंदीच्या शिक्षेचा आढावा घेण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट मंडळाने घेतला आहे. पाकिस्तानच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खेळाडूंच्या मैदानावरील तसेच मैदानाबाहेरील वर्तणूक आणि घडामोडींची चौकशी करण्यासाठी एकसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या सूचनेनंतर पाक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दारुण पराभव स्वीकारल्यानंतर पाक मंडळाने सात खेळाडूंवर कडक कारवाई केली होती. त्यानुसार युनूस खान आणि मोहम्मद युसूफ यांच्यावर आजीवन बंदी घातली होती. शोएब मलिक व राणा नावेद यांच्यावर एका वर्षाची बंदी आणि 20 लाखांचा दंड करण्यात आला होता. शाहीद आफ्रिदी आणि कामरान अकमल यांना अनुक्रमे 30 लाखांचा दंड आणि पुढील सहा महिन्यांपर्यंत वर्तन सुधारण्याचा इशारा देण्यात आला होता, तर उमर अकमलला 20 लाखांचा दंड करण्यात आला होता
 
Ref - eSakal

No comments:

Post a Comment