Wednesday, May 26, 2010

रोहिणी नक्षत्राच्या प्रारंभीच शेतकऱ्यांनी सुरू पेरणी

देवरूख - गेले चार दिवस आकाशात काळे ढग जमा होत असतानाच आणि गेले दोन दिवस पावसाच्या हलक्‍या सरींनी प्रारंभ केला असतानाच कोकणातील शेतकऱ्यांनी कालपासून रोहिणी नक्षत्राच्या प्रारंभीच पेरणी सुरू करून आपल्या वार्षिक कालचक्राला प्रारंभ केला आहे.




कोकणात दरवर्षी न चुकता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणींना प्रारंभ केला जातो. रोहिणी नक्षत्राच्या सुरवातीलाच आणि मृग नक्षत्र लागण्याआधीच पेरणी करण्याची पध्दत पुर्वापार सुरू आहे. यावर्षीचे रोहिणी नक्षत्र काल मंगळवारपासून सुरू झाले. त्याआधीच शेतकऱ्यांनी बि बियाणे खरेदी, खतांची बेगमी करून नांगर आणि बैलजोडीची तयारी करून ठेवली होती. यावर्षी पाऊस वेळेवर येणार असल्याने शेतकऱ्यांनीही पेरणी वेळेवर व्हावी यासाठी जय्यत तयारी केली आहे. रासायनिक खतांचे दर गेल्यावर्षी पेक्षा 25 ते 40 रुपयांनी वाढल्याने आणि रासायनिक खतांचा पुरवठाही सुरळीत नसल्याने असंख्य शेतकऱ्यांनी मिळेल तेवढे रासायनिक खत आणि सेंद्रीय खताचा वापर करण्याची तयारी केली आहे.



गेले चार दिवस आकाश भरून येत असल्याने आणि त्यातच गेले दोन दिवस संपूर्ण कोकणातील बहुतांश परिसरात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला आहे. भल्या पहाटे गेले दोन दिवस शेतकरी आपल्या कुटुंबासह बैलजोडी आणि नांगर घेऊन शेतात राबताना दिसत असून दोन महिन्यापूर्वी भाजावळी गेलेल्या मळ्यांमध्ये उखळ करून भातपेरणी सुरू करण्यात आली आहे. पेरणीच्या कामाला सुरवात झाल्याने शेतकरी आता आपल्या शेतीच्या वार्षिक कालचक्रात अडकला आहे. पेरणीनंतर संपुर्ण शेतात उखळ, बेर, साफसफाई नंतर चांगला पाऊस होऊन रोप तयार झाल्यावर लावणी अशा कामांमध्ये शेतकरी गुंतून पडणार आहे. गणपतीच्या सणापर्यंत ही लगबग सुरूच राहणार आहे.

No comments:

Post a Comment