Tuesday, May 11, 2010

ओरिसात व्याघ्रगणनेस वनाधिका-यांचा नकार

ओरिसात व्याघ्रगणनेस वनाधिका-यांचा नकार

भुवनेश्वर - ओरिसातील नौपाडा जिल्ह्यातील सुनाबेडा अभयारण्यात व्याघ्रगणनेस, वन खात्याच्या अधिका-यांनी नकार दिला आहे. या जंगलात माओवाद्यांचा वावर असल्याची भीती त्यांना भेडसावत असल्याने, ही मोजणी आपल्या जिवावर बेतू शकते, असे त्यांना वाटते.




या जंगलात माओवादी मुक्तपणे फिरत आहेत, अशी तक्रार वनाधिका-यांनी केली आहे. गेल्या ८ मे पासून या जंगलात वाघांची शिरगणती सुरू झाली आहे. या संदर्भात राज्य सरकारला कळविण्यात आले आहे, असे ओरिसाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. एन. पाधी यांनी सांगितले.



छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे गेल्या २९ एप्रिलला माओवाद्यांनी बीएसएफच्या पथकावर केलेल्या हल्ल्यानंतर, अनेक माओवादी ओरिसात शिरले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संगराम स्वेन या वन कामगाराने त्यांना प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा पाधी यांनी केला आहे.



या अभयारण्यात माओवादी असल्यास त्याची गृह खात्याला माहिती असावी, असे वन खात्याचे सचिव यू. एन. बेहेरा यांनी सांगितले. सुनाबेडा अभयारण्यात १५ गावे असून चाकुईता, पहारिया आणि भुंजिया या जमातींचे सुमारे १५ हजार आदिवासी राहतात. या आदिवासींनी यापूर्वीही माओवाद्यांशी संघर्ष केला आहे. या अभयारण्याने ६०० चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले असून, त्याची सीमा छत्तीसगड राज्याला भिडली आहे.

Ref : Eskal

No comments:

Post a Comment