Tuesday, May 25, 2010

भुईकोट किल्ल्यात खापरी नळाचे अवशेष

नगर - नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या खंदकाची साफसफाई वेगात सुरू असून, येत्या पंधरा दिवसांत हे काम पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जुन्या काळातील खापरी नळाद्वारे पाणीपुरवठा करणारी यंत्रणा खंदकात आढळली असून, या खापरी नळाचे सापडलेले अवशेष जतन करण्यात येणार आहेत.




सुमारे सव्वादोन किलोमीटर लांबीच्या या खंदकातील सुमारे एक किलोमीटर अंतरातील झाडेझुडुपे काढण्यात आली असून, आता आतील माती उचलून बाहेर नेण्याचे काम दोन जेसीबी यंत्रांद्वारे सुरू आहे. त्यामुळे आता हा परिसर विस्तीर्ण दिसू लागला आहे. साफसफाईदरम्यान खंदकात खापरी नळाचे अवशेष तसेच जुन्या काळातील एक विहीरही आढळली. पाचशे वर्षांपूर्वी किल्ल्याची उभारणी झाली तेव्हा किल्ल्यातील रहिवाशांसाठी कापूरवाडी व शहापूरमधून खापरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. या नळ योजनेचे अवशेष सापडले आहेत.



पहिल्या टप्प्यात खंदकाच्या साफसफाईनंतर वरच्या बाजूला खंदक ते रस्तादरम्यानच्या किल्ल्याभोवतीच्या परिसराची साफसफाई करण्यात येणार आहे. या परिसरात बगीचा विकसित करण्यात येणार असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी खंदकाभोवती कुंपण उभारण्यात येणार आहे. खंदकाच्या काही भागात नौकानयन प्रस्तावित असून, तो भाग अधिक खोल खणला जाणार आहे. अन्य भागात बगीचा व अन्य उपक्रम करण्यात येणार आहेत.



सुमारे सहा कोटी रुपये खर्चून किल्ल्याच्या पर्यटनदृष्ट्या विकासाचे नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार पहिल्या टप्प्यातील सुशोभिकरणाची कामे सुरू झाली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.



पावसाच्या पाण्याचा वापर

खंदकाच्या काही भागात नौकानयन प्रकल्प राबविण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी पावसाचे पाणी साठवून व शुद्धीकरण प्रक्रिया करून वापरले जाणार आहे. यादृष्टीने पावसाचे पाणी साठण्यासाठी नौकानयन प्रकल्पाचा भाग खोल करून तेथे खंदकातील अन्य भागांतील पावसाचे पाणी येण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment