Tuesday, May 11, 2010

तेलगळतीमुळे ऑलिव्ह रिडलीची हजारो अंडी नष्ट


तेलगळतीमुळे ऑलिव्ह रिडलीची हजारो अंडी नष्ट

ऋषिकुल्य रूकरी (ओरिसा) - गंजम जिल्ह्यातील ऋषिकुल्य नदीच्या मुखावरील पुळणीवर, नामशेष होण्याचा धोका असलेल्या ऑलिव्ह रिडली कासवांची हजारो अंडी फलित होऊ शकली नाहीत. जवळच्या गोपाळपूर बंदरात झालेल्या तेलगळतीचा परिणाम असल्याचा पर्यावरणवादी संघटनांनी दावा केला आहे.




अंडी फलित होण्याचा काळ गेल्या आठवड्यातच संपला. मात्र ४० ते ५० टक्के अंडी फलित होऊ शकलेली नाहीत. ही संख्या काही हजार इतकी आहे. जवळच्या बंदरातील तेलगळतीमुळे, कासवांच्या घरट्यांपर्यंत तेलतवंग पोचले होते. त्यामुळेच ही अंडी फलित होऊ शकली नाहीत, असे ऋषिकुल्य सागरी कासवे संरक्षण समितीचे सचिव रवींद्रनाथ साहू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.



ऋषिकुल्य किना-यावरील कासवांच्या घरट्यांच्या क्षेत्रातील सात किलोमीटरपर्यंत तेलतवंग पसरलेला आहे. गेल्या १२ एप्रिल रोजी जवळच्या गोपाळपूर बंदरात एस्सारच्या मालकीच्या तेलाच्या टँकरमधून आठ टन फर्नेस ऑईलची गळती झाली आहे. भरतीच्या लाटांमुळे ते तेल किना-यावर पसरले.



साहू म्हणाले, की ऋषिकुल्य गावातील अनेक ग्रामस्थांनी तेलाने लडबडलेली मोठी कासवे प्रत्यक्ष पाहिली आहेत. यंदा ओरिसातील या किना-यावर १,५५,००० दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांनी मार्चमध्ये घरटी केली होती. गेल्या तीन आठवड्यांपासून ही अंडी फलित होऊ लागली आणि गेल्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण झाली.

No comments:

Post a Comment