Monday, May 10, 2010

तंत्रज्ञानामुळे बसतोय घातक वायूंना आळा

तंत्रज्ञानामुळे बसतोय घातक वायूंना आळा

पुणे - "नवनवीन तंत्रज्ञानामुळे घातक वायूंना आळा बसण्यास मदत होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच देश कमी-अधिक प्रमाणात या दिशेने प्रयत्न करीत आहेत. ओझोन थराला हानी पोचविणाऱ्या "क्‍लोरोफ्लुरो कार्बन' वायूची निर्मिती सर्वच देशांनी नवीन तंत्रज्ञान वापरून एक जानेवारी 2010 पासून थांबविली आहे. आता वातानुकूलित यंत्रांमधून निर्माण होणाऱ्या "हायड्रोफ्लुरो कार्बन'ला रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,'' अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातील ओझोन कृती गटाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. या विशेष मुलाखतीत पर्यावरण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल श्री. शेंडे यांनी भाष्य केले.




पृथ्वीपासून 15 ते 40 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या "ओझोन' थराला हानी पोचविणारे एकूण 97 वायू आणि रसायने आहेत. त्यात "क्‍लोरोफ्लुरो कार्बन' हा रेफ्रिजरेटरमध्ये वापरण्यात येणारा प्रमुख घटक आहे. क्‍लोरोफ्लुरो कार्बनचा वापर रेफ्रिजिरेटरमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असे. त्या संदर्भात श्री. शेंडे म्हणाले, "क्‍लोरोफ्लुरो कार्बनमुळे ओझोनला धोका असल्याचे 1975 मध्ये पुढे आले. विकसित देशांनी या संशोधनाला विरोध केला. मात्र, 1985 मध्ये "नासा' आणि "युरोपियन स्पेस एजन्सी'च्या शास्त्रज्ञांनी धोक्‍याचा नव्याने इशारा दिल्यानंतर त्यांना जाग आली. 1987 मध्ये 24 देशांनी एकत्र येत "मॉंट्रियल करार' केला. इतर देशांनाही त्याचे महत्त्व पटले. संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेले सर्व देश त्यात सहभागी झाले. करारातील उल्लेखानुसार पर्यायी वायूंवर संशोधन सुरू झाले. विकसित राष्ट्रांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे घातक वायूंची निर्मिती पूर्णपणे थांबविण्यात यश आले. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाला अपायकारक वायूंचेच उत्पादन बंद करण्यात असे यश मिळते आहे.''



संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपक्रमांनिमित्त श्री. शेंडे भारत दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले, "पर्यावरण वाचविण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या सर्व देशांनी "मॉंट्रियल करार' केला आहे. रेफ्रिजिरेटर आणि एअर कंडिशनरमध्ये तयार होणारे अनुक्रमे क्‍लोरोफ्लुरो आणि हायड्रो क्‍लोरोफ्लुरो हे वायू "ओझोन' थराला हानी पोचवितात. तापमानवाढीस क्‍लोरोफ्लुरो कार्बन वायू जास्त हानिकारक असतो. करारानुसार सर्व देश या वायूला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी विकसित देशांकडून विकसनशील देशांनाही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 2030 पर्यंत "एसीएफसी' पूर्णपणे नष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. सन 2007 मध्ये या देशांनी एकत्र येऊन पर्यायी वायू वापरण्याचा निर्णय घेतला आहे. "एसीएफसी' वायू तापमानवाढीस किती घातक आहे, हे विकसित देशांना पटवून देण्यास बराच काळ लागला. पर्यावरणाच्या रक्षणासाठी "एसीएफसी'चे उत्पादन बंद करण्यात यश आले, तसेच आता "हायड्रो क्‍लोरोफ्लुरो कार्बन' या वायूचे उत्पादन बंद करण्यात यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.''



ओझोन गटाचा उद्देश

- जागतिक तापमानवाढ रोखणे

- ओझोनच्या थराचा होत असलेला ऱ्हास थांबविणे

- कार्याची व्याप्ती संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असेलेल्या जगभरातील 195 देशांमध्ये
 
 Ref : Esakal

No comments:

Post a Comment