Tuesday, May 11, 2010

कागदी पिशव्यांच्या वापरासाठी रोटरी क्‍लबतर्फे जनजागृती

कागदी पिशव्यांच्या वापरासाठी रोटरी क्‍लबतर्फे जनजागृती

पुणे - निसर्गाचे व पर्यावरणाचे संतुलन सांभाळणाऱ्या, जैविक विघटनास सुकर असणाऱ्या प्लॅस्टिकऐवजी रद्दी वर्तमानपत्रांपासून बनविलेल्या कागदी पिशव्यांचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन रोटरी क्‍लब ऑफ पुणे सेंट्रलचे सुरेंद्र श्रॉफ यांनी केले आहे. त्यासाठी प्रचाराची मोहीमही राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.




वर्तमानपत्रापासून या पिशव्या कशा तयार कराव्यात, यासाठी क्‍लबतर्फे देशभरात आतापर्यंत चारशे ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास चार हजार नागरिकांनी प्रशिक्षण घेतले आहे, तर चाळीस गटांनी हे उपजीविकेचे साधन बनविले आहे. या गटांनी आतापर्यंत एक कोटी पिशव्यांची निर्मिती करून विक्री केली आहे. त्यासाठी क्‍लबतर्फे आर्थिक मदतही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.



या पिशव्यांमुळे पर्यावरणाचे संतुलन राहत असून मलनिस्सारणाचे पाइप तुंबणे, जनावरांना त्रास होणे आदी सर्वच गोष्टींना आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच पन्नास पैशांपासून ते पाच रुपयांपर्यंत या पिशव्या उपलब्ध होऊ शकतात. एक किलोपासून 15 किलोपर्यंतचे वजन त्या पिशव्या पेलू शकतात. त्यामुळे ज्यांना या पिशव्या हव्या असतील अथवा तयार करण्याचे प्रशिक्षण हवे असेल, त्यांना क्‍लबतर्फे निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी इच्छुकांनी 9850561557 अथवा 25677498 येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्रॉफ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment